10+ Short Moral Story In Marathi

10+ Short Moral Story In Marathi 


रातराणी-एका आईची व्यथा...


तिन्हीसांज झालेली असते. जुई तुळसी वृंदावनपाशी उदबत्ती लावून आत येते. आक्की देवाजवळ बसलेली असते तिला घेवून बाहेर आली. हातात जपाची माळ घेवून आक्की आराम खुर्चीत जप करत बसते. काजव्याचा किर्रकिर्र आवाज सुरु होतो.  रातराणीला आज खूपच फूल होती.  केवड्याची धूप काडी लावून आक्कीला हात लावून सांगितले," मी बाहेर जावून येते. कुणाल दादाचा फोन आला तर सांग लग्नाला ये म्हणून. हा फोन इथेच ठेवते आणि जेवण इकडे जेवण झाकून ठेवले आहे माझी वाट पाहू नको. भूक लागली की जेवून घे. चावी मी घेवून जाते. " जुईच्या एवढ्या वाक्यांना आक्कीने ,'बरं बरं' म्हंटले आणि डोळे मिटून जपात गुंग आहोत असे दाखवले.  दरवाजा बंद केल्याचा आवाज झाला. तसा आक्की हातातील माळ बाजूला ठेवून डोळे बंद करून विचारात बसते. कशातच मूड लागत नाही.  कुणालचा आत्ता फोन यावा आणि मला शिकागोला घेवून जातो असे म्हणावे. गेले कित्येक दिवस हेच चाललंय. त्याचा विझा मिळाला कि घेवून जातो. पण हे फक्त निम्मित्तच. मुलगा सून आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. का मी अशी म्हणून मला टाळतात. मी तिकडे गेले तर अडगळ होईन का त्यांना. जुईचे आता लग्न आहे ती चालली आहे सासरी. सगळे त्याला कळवले तरीही अजून मार्ग आपल्याल्या सापडत नाही.
जुईचा विचार करता सगळा भूतकाळ आता आक्कीला आठवतोय. जुईही खरी पाहता आक्कीची खरी मुलगी नाही.  आक्की जिथे नोकरी करत होती स्टेनो म्हणून.  तिकडच्या बस स्थानकाजवळ नेहमी प्रमाणे आली. बसची वाट पाहत उभी होती. कुणाल हा बारा वर्षाचा होता आणि नवरा केशव हा नेव्ही मध्ये असल्याने तो सहा सहा महिने शिप वर असायचा त्यामुळे कुणालची जबाबदारी सगळी आक्कीचीच होती. ही भिक मागत होती भुकेचा आव आणून आणि म्हणून आक्कीच्या पर्समध्ये डब्यात लाडू होता. तो तिने काढून या मुलीला दिला. आक्कीचे लक्ष नसताना तिने जावून तो दिव्याच्या पोल मागे टाकला. तिथे एका बस प्रवाशाने आक्कीला टोला मारला, "नको तिकडे दुनियादारी करायची नाही या भिकाऱ्यानाच जास्त ओकारी असते." आक्कीच्या डोक्यात जरा तिडीकच गेली.  तिने तिला हाताला धरून रागे भरायला सुरुवात केली ," तुला नको हवे होते तर तसे सांगयाचेस नं. ते पण पैसे देवूनच आणतो नं आम्ही. तू भुकेचा आव आणलास म्हणून मी तुला ते दिले." यावर ही मुलगी म्हणजे यांच्या टोळीतील रिंकी जोरजोरात रडायला लागली," आक्की आक्की नको मारू मला. मला जाम भूक लागलेय पन आमचा दादा भाई फक्त पैसे घेवून य सांगतो. तो फक्त दुपारी आणि रात्री वडापाव खायला पैशे देतो." हिला भयानक काही सांगायचे आहे. आक्कीने तिचे सगळे ऐकायची तयारी दाखवली. यावर ती आणखी हुंदके द्यायला लागली. एक बस येवून मागून गेली. तरी आक्कीला या मुलीला सोडावेसे वाटले नाही. पुन्हा रडता रडता तिने तिचे सारे दु:ख आक्कीच्या डोळ्यात ओतले. 
दादाभाईला आम्हाला खायला बंदी केली आहे जर पैशे आणले नाय तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा असाच लाडू खावून गेलो आनी तोंडाला रवा चीटकला त्याने माझा ओठ आवळून काढला. दुसर्या दिवशी लाडू खावून पानी पिवून गेले तर फ्रोकी ओली दिसली म्हनून त्याने मला बेदम मारले. एकदा तहान लागलेली म्हनून गोळेवाल्याने उरलेले सरबत दिले. ओठ लाल लाल झालेले पाहून मला बेदम मारले. म्हनून मला पैशेच लागतात. आक्कीने तिला जवळ केले गोंजारले आणि आपण यावर तोडगा काढूत असे सांगून तिचे राहण्याचे ठिकाण विचारले. दुसर्या दिवशी स्त्री मुक्तीच्या महिला आणि पोलिस घेवून त्या दादा भाईला समज द्यायला गेली. पण कोणाचे धूप खातोय कुठे तो. उलटा आक्कीला उलटा बोलला की तुला एवढा पुळका असेल तर घेवून जा हिला.  पोलिसांनी त्याला आठ दिवस जेल मध्ये ठेवले.  आक्की ने घरी येवून केशवला फोन करून कळवले. आपल्या घरी आणूयात का तिला पण केशव नकोच म्हणाला त्या मुलीवरून नसते कोणते प्रकरण नको. आक्कीने केशवला विश्वासात घेवून असे काही होणार नाही असे सांगितले. केशवने त्याच्या वकील मित्राला फोन करून तिच्या सोबत राहा आणि सगळे काही ते रीतसर कर. केशवचे जोडून ठेवलेले मित्र नेहमी हाकेला उभे राहायचे. एकदाचे तिला त्या दादाभाईच्या कचाट्यातून सोडवले. आक्कीला मुलीची आवड खूप होती. पण केशवच्या सतत लांब राहण्याने ते शक्यच झाले नाही. तिने आदल्यादिवशीच जुईची वेल लावली होती. म्हणून हिचे नाव जुई ठेवले. आक्कीचे राहते घर तसे लहान होते कारण तिला बाग फार आवडे आणि एका कोपऱ्यात केशवने छोटे गॅरेज काढले होते तो आला की सहा महिने छोटे मोठे काम घेई. कुणाल तसा अबोल. जुईशी फारसा बोलत नसे.  जुईला मात्र त्याला सारखे कुणाल दादा, कुणाल दादा हाक मारावीशी वाटे. कुणालला चित्र काढायला फार आवडे तो बागेत बसून छान छान चित्र काढी.हळू हळू आक्कीने जुईलाही बडबडगीते शिकवली. " गर गर फिरून दमला पंखा, एक होत झुरळ, या बाई या". विमला हि मागच्याच झोपडीत राहणारी नवरा मारतो म्हणून कुणाल सोबत इकडेच थांबायची.  ती ही जवळ घ्यायची जुईला. पण रस्त्यावरचे झोपडे, काऊ, चिवू शिवाय जग नं बघितलेली हि मुलगी अर्थशून्य नजरेने बघत रहायची. हिला फोर्स करण्यात काहीच अर्थ नव्हता. तिला तिचा भूतकाळ वर्तमानकाळ स्थिरस्थावर व्हायला वेळ लागेल. एके दिवशी आळीतील सार्वजनिक पूजेचा तो दिवस. संध्याकाळी आक्की घराच्या दिशेला येताना पिंगे मास्तर भेटले," अगं कुणाल थेट शाळेतून येवून बसलाय. चित्र काढतोय. तू लवकर ये आणि त्याच्यासाठी चांगला शर्ट घेवून ये." आक्की ने स्मितहास्य करून हो म्हणत घराकडे आली तोच फाटकाकडे जुई परकर पोलक्यात विमालासह उभी. आक्कीला पाहून खूष. आक्कीने तिच्या छान दिसण्याचे कौतुक केले. पण मनात एक खंत होती की हिला आपण अजून आळी फिरवली नाही मग हि सगळ्यांमध्ये रमेल ना. तिकडे पाहिल्यावर पिंगे मास्तरांनी तिला जवळ घेतले. जमेल त्याच्याशी ओळख करून दिली. स्पर्धा काहीश्या घेण्यात आल्या. लहान मुलांचे अनुभव कथन सुरु झाले. कोणी सायकलवरून पडण्याचा अनुभव सांगितला तर कोणी आजीबरोबरची मस्ती. जुईने आपल्याला पण बोलायचे आहे असे सांगून पिंगे मास्तरांना स्टेजवर चढवायला सांगितले. जुई अगदी हावभाव करत," बसले होते ओटीवर खेळत होते भातुकली. तिकडून आला साधू म्हणाला,' भिक्षा वाड माई '. मी म्हंटले, 'माई नाही मी जुई'. बस्स एकाच टाळ्यांचा गडगडाट. कुणालने तर वर चढून जुईला जवळ घेतले.  तेव्हापासून जुई अगदी सगळ्या आळीची लाडकी झाली. आक्की फारच धन्य झाली.
एके दिवशी उन्हाळी सुट्टीत केशव येणार होता म्हणून सुट्टी घेवून फेण्या, चिकवड्या बाहेर सुकत ठेवल्या होत्या. जुईला बाहेर लक्ष ठेवायला सांगितले. विमला मध्ये मध्ये येउन जात होती आणि जुई आपल्याला कुणाल दादासारखे चित्र काढता येते का ते पाहत गुंग होती. तेवढ्यात तिकडे माकड आले आणि दोन फेण्या चांगल्याच उचलून कुडुमकुडुम खात बसले.  जुईने जोराचा टाहो फोडला. आक्की, विमला दोघी घाबरत बाहेर आल्या. पाहतो तो तर काय ते माकड पळून गेले. पण आपल्या फेण्या घेतल्या . आक्की यावर तिला गप्प करते," त्याच्या नशिबाचा दाणा आहे तो खावून गेला. त्याला तरी कोण देणार आपल्याशिवाय". आक्कीचे तत्त्व कळण्याएवढी जुईला समज आली नव्हती. ती अर्थशून्य होवून पाहत होती. विमला आक्कीची थट्टा करत आत गेली, " म्हातारपणची काठी आवडली हो मला." श्रावणातील एका रविवारी छानसे ऊन पडले होते. कुणाल चित्रकलेच्या परीक्षेला गेला होता. आक्कीने जुईला एका वाटीत शेव कुरमुरे कालवून दिले. तिला खात बस असे सांगितले. विमलाही मार्लेश्वर यात्रेला गेली होती. आपण ओल्या नारळाच्या करंजा करायच्या आहेत तेव्हा मी मागच्या वाण्याकडून नारळ घेवून येते. ती येताना ऊन पावसाची ती सर दोन मिनिटांची आली म्हणून ती थांबली. येताना फाटकातून पाहते तर काय जुई बाहेर ओटीवर येवून मांडीत डोके खुपसून रडत बसली होती. हातात कपडे वाळत घालायची काठी. फाटक तर बंद आहे. पाच मिनिटात काय झाले असेल एवढे.. मग आत कोण आले असेल, कोणी काय केले असेल का जुईला. भीतीने आक्कीचे पाय जमिनीवर पडेनात. पटकन तिला मांडीवर घेतले. तिला कवटाळले. आक्की आक्की," जोलाचा पाउश आला कुणाल दादाचा शत्त भिजला. माझा हातच नाय पोचला " आता मात्र आक्की अगदी फिदी फिदी हसायला लागली. जुई तिच्याकडे निरागस बघायला लागली. म्हणता म्हणता जुई शाळेत रमली कुणालची पण दहावी आली. एक दिवस केशवला आपल्या राहत्या खोलीत ड्रग्स सापडले म्हणून निलंबित केले तिथूनच येत असताना एका ट्रेन अपघातात केशवचा मृत्यू झाला. आक्कीची दोन मुलांकडे बघत अगदीच सावली कशी निघून आली याच्या विचारात ती आजारी पडली. हे सगळे झाले की कोणी केले. केशवच्या मित्रांनी आक्कीला सगळे फंड आणि पेपर सोडवण्यात मदत केली.  सगळे तिच्याकडे आदराने पाहत म्हणून केशव निर्धास्त होता. केशवच्या आठवणीत ती झुरून गेली होती. रडून रडून तिने स्वतःला अबोल केले होते. एक दिवस संध्याकाळी तुळशीला दिवा लावला आणि रातराणीला न्याहाळून आत येताना ओटीवर ती धडपडली. जुईने तिला सावरले. डॉक्टर घरी आले आणि रातआंधळे पणाची लक्षणे असल्याची सांगितले. दुसर्या दिवशी कुणाल बरोबर जाऊन तपासणी केली.  लगेच शस्त्रक्रिया केली पण ती यशस्वी झाली नाही. आक्कीला नोकरी सोडावी लागली. कुणालचे शिक्षण झाले तसा तो शिकागोला गेला. जाताना आपण दोन वर्षासाठीच जातो आहोत आपल्याला आर्ट शॉप इकडे येवून काढायचे आहे. तोपर्यंत जुई आहेच तुझ्यासोबत पण कसले काय हा तिकडे गेला तो तिकडची भारतीय किर्तीशी लग्न केले. विझ्झाच्या नावाने आक्कीला चुना लावत होता. 
जुई मनापासून आक्कीची सेवा करी. बारावी नंतर तिने असे फाईन आर्ट्सला जाऊन घरगुती वस्तू विकणे पडदा, रुखवत, सोफ्ट टोय्स असे सगळे ती घरीच करी. तसेच तिने बाहेर आक्कीला नर्सरी काढायला सुचवले. आक्कीचा सकाळचा छान वेळ जाई. लोकही तिच्याकडून रोपं विकत घेत.  दोघींच्या व्यवसायानिम्मित ओळखी छान वाढत गेल्या. बाहेरची कामे जूईच बघे. कुणालने तिला जाण्याच्या आधी बँक पासून सगळे व्यवहार दाखवून ठेवले होते. एके दिवशी रात्री जुई उशिरा परत आली आणि गप्प गप्प होती. रात्रीचे तिचे सगळे निरीक्षण आक्की करत होती. रात्री झोपायच्या खोलीत आक्कीच्या मांडीवर डोक ठेवून, "आक्की मेडिकल स्टोअर मधील आकाश मला आवडतो. आम्हाला लग्न करायचे आहे." आक्कीच्या शस्त्रक्रिये नंतर जुईचे सतत जाणे होई मेडिकल मध्ये. तिथेच हिची भेट झाली. तिने असे अचानक मला लग्न करायचे आहे असे सांगावे साधे विचारूही नये. ही कोणती पद्धत. या विचाराने सगळे आठवून आक्की खचली होती.  जुई अंदाजाने तेविशीची असावी. तसे लग्नाचे वय पण नव्हते पण एखादे वर्ष थांबली असती तर. असे विचार करत बसली होती. आपल्या तरी डोक्यात स्वार्थी विचार का यावा असे एक मन सांगत होते. तर दुसरे मन जाऊदेत तिला आपण संपूर्णतः आंधळे झालो तर तिचे काय. कुणाल तिला काय सांभाळणार आहे. तो मलाच आशेवर ठेवून गेलाय. आतापर्यंत बरीच रात्र झाली होती न कुणालचा फोन न हिचा पत्ता. बर आता हिला विचारवं तरी कुठल्या नात्याने. तिने तर आपण परके असल्यासारखे नुसते आपल्या कानावर घातले आहे. आक्की तेव्हापासून तिच्या बरोबर औपाचारीकच बोलत होती.  आक्कीने निवांत मागे टेकून एक मोठा श्वास घेतला आणि ठरवले. त्याला पण अडवायचे नाही आणि हिला पण नको. सरळ आपण आता आपले जमलेले पुंजी घेवून वृद्धाश्रमात जावे. तिथे सगळे समवयस्क आपल्याला भेटतील. जाईल आपला वेळ छान. दोघंही आपल्या आपल्या स्वप्नात सुखी राहोत. जुईच्या उद्याच कानावर घालून आपण आपला रस्ता धरावा.  आक्कीच्या चेहऱ्यावर जरा तेज आल. एवढ्यात खट आवाज झाला. बहुधा घुबड आल बाहेरच्या ओटीवर रात्रीच येवून बसतं. त्याला रात्रीच दिसतं आणि आपल्याला सकाळच.  काय विरोधाभास आहे. काजव्यांचा किरकिरर्र्र आवाज वाढत चालला होता. आपल्याला सकारात्मक निर्णयाने आक्कीला भूक लागली. तिने ताट झाकलेले उघडले. आज अळूचे फद्फद. सकाळी फुलं काढताना आक्कीने अळू आलेले पहिले. पण तिची इच्छा काही होईना कापायची.  जुईने आपल्याला न विचारता अळू केले. पण छान केले होते. आक्की अगदी मनापासून जेवली. जुईची वाट पाहत खिडकीत चाचपडत येवून बसली. तिच्या दार उघडण्याचा आवाज झाला तशी पलंगावर जाऊन झोपली. पहाटे तिला चांगलीच लवकर जाग आली. पारिजातकाचा सडा उजेडल्याचे सांगत होता. आक्की उठून बसली. आता लवकरच आपली घुसमट थांबेल. केशवच्या फोटोकडे बघत ती कराग्रे वसते म्हंटले आणि अंघोळीला गेली. तुळशीला पाणी घालून. फुल परडीत घेवून देवघरात येवून बसली. अर्धी पूजा होते न होते तोच दार खणखणले. दारात आकाश पांढरा चाफा आणि सोनटका घेवून उभा. आक्कीला आश्चर्य वाटते, " आकाश तू एवढ्या सकाळी. सगळे ठीक आहे न. जुई आत आहे. तू आत ये न. ही फुल आणलीस होय. छान " आक्कीचा हा सूर ऐकून आकाश जरा निवळलाच. जुई आतून बाहेर चहा बिस्किटे घेवून येते. दोघं आक्की साठी थांबतात. आक्कीची पूजा होते तशी आक्की येते. टेबलाकडे बसते. जुई आक्कीला जवळ करते. " आक्की तुला इतकी निर्दयी आणि क्रूर वाटले का गं मी. सारखी गप्प गप्प राहते. माझ्याकडे आशेने बघत नाहीस. आपली बाहेरची रातराणी अशीच आहे पण घरातील रातराणी चालली या विचाराने तू कोमेजून गेलीस नं? अगं ज्या डोळस पणे तू मला इथे आणलस तिथून आंधळे पणाने तुला टाकून जाईन असे वाटले का? अग गेले कित्येक दिवस आम्ही तुझ्यासाठी फिरतो आहोत. चांगल्या डॉक्टरला तुझे पेपर दाखवून आम्ही तुझ्यासाठी शस्त्रक्रिया पाहतो आहोत आणि डॉक्टर मिळालेत सुद्धा. परळला आहे त्यांचे मोठे हॉस्पिटल. हो आणि ती जरी यशस्वी नाही झाली तरी आम्ही तुझे डोळे बनून तुझ्या बरोबरच राहणार आहोत. कुणाल दादा परत येईपर्यंत किंवा कायमचे. आकाश इथेच येणार आहे आपल्यासोबत. आमच्या घरी ते मान्य आहे. तुझी रात्र, तुझी सकाळ, तुझा श्वास, तुझी स्पंदन आम्हीच आक्की आम्हीच ."  आपण कशावरून काय सूत गाठले होते जुईबद्दल आणि जुई आपल्यासाठी काय आहे हे तिने दाखवून दिले. आक्की दोघांना जवळ करून हुंदके देत रडत राहिली निशब्द........

जगणे केले आनंदगाणे

मी नर्मदा,वय वर्षे ७०. वृद्धाश्रमात आहे ,पण खबरदार माझ्याबद्दल सहानूभूती व्यक्त केलीत तर. मस्त मजेत आहे मी. स्वत:ला इथे भरती करून घेतलं तेव्हा इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं. सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर बारा वाजलेले असायचे...... म्हटलं हे काही खरं नाही. व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्था चालकांची परवानगी घेऊन, पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला.
दु:ख कुणाला नसतं? पण त्याचा गाजावाजा कशाला करत बसायचं ? माझ्या आयुष्याचा प्रवासही अनेक धक्क्याचा आहे. लग्नाला पंधरा वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करुनही मूल बाळ होत नाही म्हणून पार संसाराची घडी विस्कटली. खूप सोसलं , खूप ऐकलं, मी आणि आमच्या "ह्यानी" सुद्धा.
"नर्मदा...... असं दु:खात कितीदिवस बसायचं? स्वतःचं मूल नशिबात नाही, ठीक आहे . आपण मूल दत्तक घेऊ"... असे आमचे हे म्हणाले.पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबानं दुसरी खेळी खेळली. आमचे 'हे' हार्ट अटॅकने आकस्मिक गेले. आणि दु:खाच्या लाटेत मी बुडून गेले. पण नंतर आयुष्यासमोर धडाडीनं उभी राहीले, बघु म्हटलं किती संकट' येतायत? रडणं आणि भोगणं सोडलं, जगणं सुरु केलं. एकट्याने आनंदी रहायला शिकले. फक्त पुस्तकं वाचून नाही तर जगण्यातल्या अनुभवातून. जेवणाचे डबे पूरवून आर्थिक बाजू सांभाळली.जमेल तसं, जमेल तेवढं गरजुंना, आजूबाजूच्यांना मदत केली. जगण्यानं प्रश्न दिले आणि त्याची उत्तरं शोधता शोधता काळ सरकत गेला.
काळ कुणासाठी थांबतो? शारिरीक क्षमता कमी झाल्यावर "वृद्धाश्रम" हीच आपल्या आयुष्याची संध्याकाळ, म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायेच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्यासाठी विनंती केली, पण मी म्हणाले माझे हात पाय धड आहेत तोवर माझ्या पायानं तिथल्या वाटेवर जाऊ दे. मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला द्यायचा नाही.
वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागले. मी स्वत: निराधार असून इतरांना आधार देते हा विचारच मला स्वतःचं दु:ख बाजूला ठेवायला सांगतो. एकदा इथली एकजण मला म्हणाली "तुमचं दु:ख वेगळ.... माझं दु:ख वेगळ,मला माझ्या सख्ख्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट दाखवली. आतडी तुटतात हो..... तुम्हाला नाही कळणार". मी दु:खी झाले,मनात म्हणाले "हो मला नाही कळणार... मला मूलंच नाही ना?"
तिचंही खरंच होतं. मुलगा असुनही असं... माणसाच्या जगण्याची काय गंमत असते नाही? सुखाच्या दिवसांच्या आठवणी होतात आणि ते सुख आता नसलं की त्या आठवणी दु:खद होतात.
कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं. सगळे नियम आपणच तयार करतो. माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेलं आणि आता उसंत मिळाली आणि ते....ते.... इथले ते विधूर सावंत आजोबा मला आवडायला लागलेत. खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली.... आज आमचं भेटायचं ठरलय. काल ते मला म्हणाले," उद्या आपण सकाळी दहा वाजता भेटायचं का? थोडं काम आहे."
मला माहित होतं, कसलं काम आहे, तरी मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले , हो का? बरं सुनिला बरोबर भेटते मी.
"सुनिला"?... तू एकटी भेटशील का? तूझ्याकडेच काम आहे..... मी तयार झाले. प्रेमाला कुठे वय असतं का? मनाची दारं, खिडक्या उघडल्या की बाहेरचं सौदर्य दिसतं. जीवनाचं एक रहस्य मला कळालं, कशातही गुंतून रहायचं नाही. हे विश्वची माझे घर म्हणत आनंदाने जगायचं.
चला,खूप बोलले. सावंताना भेटायला जाण्याआधी आवरायचंय. नविन साडी नेसणार आहे. आजच प्रपोज केला त्यांनी, तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना?

वसंत फुलला

त्याचं येणं तिला नवीन नव्हतं, अनपेक्षित तर मुळीच नाही. तरीही दर वेळी त्याच्या आगमनाची वर्दी देणारं कोकीळकूजन ऐकलं, की ती अंतर्बाह्य थरारून जात असे. त्याच्या स्वागतासाठी मग ती तिचा सर्वोत्तम साज लेवून तयार राहत असे... जणू तिच्या शृंगारपाशात अडकून वसंत कायमचा तिच्याजवळ थांबणार होता!

तसं होणं नाही, हे मात्र तिला पुरेपूर माहीत होतं. दोन महिन्यांचा तो पाहुणा - आंबेमोहोराचा पाहुणचार झोडून तो परतीला निघे, त्यानंतर होताच विरहाचा ग्रीष्म तनमन जाळायला.

"कुहूss कुहूsss"

कोकिळाच्या आवाजाची डोअरबेल वाजली तेव्हा चैतू तिच्या काव्यमय सुखस्वप्नातून बाहेर आली.

"आला वाटतं वसंत..." असं स्वतःशीच म्हणत ती दार उघडायला पळाली. दार उघडताच वसंताला पहिलं दर्शन कुणाचं व्हावं तर ते चैतूचंच, असा आता बऱ्याच वर्षांचा रिवाज पडला होता.

"काय म्हणतेय माझी चैत्रपालवी?" दरवाजात आपल्या हृदयस्वामिनीला पाहून वसंतानं लडिवाळपणे विचारलं.

त्याचा नेहमीचा प्रश्न ऐकून चैतू मनापासून लाजली. त्याच्याखेरीज कुणीच तिचं संपूर्ण नाव घेत नसे. 'चैत्रपालवी' हे तिचं घसघशीत नाव फक्त शाळा-कॉलेजच्या दाखल्यांत सीमित होऊन राहिलं होतं - बाहेरच्या, खऱ्या जगासाठी ती केवळ 'चैतू' होती. अपवाद फक्त तिच्या नि वसंताच्या या प्रेमभऱ्या दुनियेचा... ही दुनिया फक्त त्या दोघांची होती; दोघांसाठी होती; दोघांपुरती होती. आणि वसंतानं तिचं असं पूर्ण नाव घेणं हा जणू त्यांच्या त्या सुखमयी दुनियेत प्रवेशण्याचा परवलीचा शब्द होता. "तिळा उघड" म्हटलं की नाही ती अलिबाबाची गुहा उघडायची?

"राणीसाहेब, दारातच उभं ठेवणार आहात, की घरातही घेणार आहात?" वसंता खट्याळपणे म्हणाला, तेव्हा ती पुन्हा लाजली. अंग आक्रसून घेत एका बाजूला झाली. पण थेट आत येण्याऐवजी वसंतानं हातातल्या बॅगा खाली ठेवल्या आणि दोन्ही हातांनी तिला आपल्या बाहुपाशात ओढलं.

विरह आणि प्रतीक्षेमुळं प्रेम वाढतं म्हणतात, ते खरं असावं. इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियतमाच्या मिठीत विरघळून जाण्याचं सुख चैतू अनुभवू लागली. त्याचीही अवस्था काही निराळी नव्हती, हे त्याच्या आलिंगनातील जोरानं तिला जाणवलं. हृदयात खूप ऊब जाणवली तिला या विचारानं. तिनंही त्याच्याभोवती तिचा प्रेमपाश आवळला.

त्या दोन विरही प्रेमजीवांचे आतुर अधर एकरूप होण्यासाठी आसुसलेले असतानाच त्यांना कुणाचा तरी पदरव जाणवला. अनिच्छेनं... मोठ्या कष्टानं ते परस्परांपासून विलग झाले.

"आई!" वसंत उद्गारला.

गोरीमोरी होत चैतू दूर सरकली आणि चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी तिनं पटकन वाकून वसंताच्या बॅगा उचलल्या. सासूबाईंकडे न पाहता ती चटकन आत पळाली.

राधक्का छानसं हसल्या.

वसंत पुढं झाला आणि त्यानं वाकून त्यांचे पाय स्पर्शले.

"आयुष्यमान भव!" असा आशीर्वाद देत त्यांनी वसंताच्या खांद्याला धरून उठवलं आणि हृदयाशी घेतलं. कित्येक महिन्यांपासून या माऊलीची ममता आपल्या लेकराला डोळे भरून पाहण्यासाठी व्याकुळलेली होती. आपोआपच त्यांचं प्रेम डोळ्यांतून पाझरून त्यांना बिलगलेल्या वसंताच्या डोक्यावर मूकपणे अभिषेक करू लागलं.

"या वेळी आलास ना बाळा चांगली मोठी सुटी काढून?" त्यांनी नेहमीचाच प्रश्न विचारला आणि वसंतानं नेहमीसारखाच तो हसून टाळला.

"चल, अगोदर पटकन हात-पाय-तोंड धुवून घे; मी लगेच जेवायला वाढते..." असं म्हणत राधक्का लगबगीनं किचनकडं वळल्या.

'तू नकोस तसदी घेऊ, चैतू बघेल ना स्वैपाकाचं,' असं अगदी जिभेवर आलं वसंताच्या, पण तो बोलला नाही. वयोमानानं थकल्या असल्या, तरी आपल्या पोटच्या गोळ्याला दोन घास स्वतः शिजवून खाऊ घालण्यात आपल्या आईला किती सुख-संतोष आहे, हे वसंत जाणून होता. तिचं ते हक्काचं सुख का हिरावून घ्या?

त्याच्या स्वागताची चैतूनंही जय्यत तयारी केलेली होती. डायनिंग टेबलावरचा सरंजाम पाहूनच वसंताची छाती दडपून गेली. पण तो चवीनं प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला. तो जेवत थोडाच होता? तो तर त्या दोघींचं त्याच्यावरचं अपरंपार प्रेम चाखत होता. त्याचं पोट तर त्या दोघींच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहूनच भरलं होतं. त्या दोघींच्या चेहऱ्यावर खरा वसंत फुललेला होता.

"वसंता," राधक्का कातर आवाजात म्हणाल्या, "बेटा, मला तुझा फार, फार अभिमान आहे.... आज हे असते, तर ह्यांनाही तुझा अभिमान वाटला असता. राणे घराण्याचं नाव राखलंस, वसंता. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती."

वसंतानं भिंतीकडे पाहिलं. त्याचे वडिल खरोखर आनंदी आहेत आणि फोटोतून त्याला आशीर्वाद देताहेत, असं त्याला वाटलं. त्यानं हात जोडले. मेजर जयदीप राणे! पूर्ण गणवेशातील त्यांचा फोटो त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला होता. दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हिरावलं गेलं असलं, तरी त्यांचे फोटो, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचे मेडल्स पाहून, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शौर्याच्या कहाण्या राधक्कांच्या तोंडून ऐकून त्यानं शाळकरी वयातच निश्चय केला होता - बाबांसारखंच आपणही सैन्यात भरती व्हायचं, देशाची सेवा करायची, ध्वज उंच करायचा आणि आपल्या बाबांचा पुत्र असल्याची स्वतःची लायकी सिद्ध करायची!

आणि आज आपल्या मातेकडून प्रशंसेचे शब्द ऐकून त्याची मान ताठ झाली... जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला.

पण केवळ दोनच महिन्यांपूर्वी स्थिती निराळी होती.

त्याला आठवले ते कमजोर क्षण... मनाला कमकुवत करणारे ते विचार... आपला निर्धार क्षीण करणारी मोहाची ती घटिका! दोन महिन्यांपूर्वी - हो, दोनच तर महिन्यांपूर्वी... पण आता किती दूरचा भूतकाळ वाटतोय तो!

सीमेवरची, आता नेहमीचीच झालेली, फुटकळ चकमक पाहता पाहता मोठ्या धुमश्चक्रीत केव्हा परिवर्तीत झाली, ते कुणालाच कळलं नव्हतं. ते फक्त घुसखोर नव्हते - त्यांच्यामागे उभं राहून त्या नतद्रष्ट शेजारी देशाचं सैन्य जणू भारताला शह देत होतं. साध्या गावठी उखळी तोफा कुठं आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बूमर्स कुठं!

आणि ती परीक्षेची घटिका अशीच अवचित आली. वसंताच्या खांद्याला खांदा लावून लढणारा त्याचा सहकारी, नव्हे, त्याचा मित्र, अचानक कोसळला आणि वसंताचं लक्ष एक क्षण शत्रूवरून विचलित झालं. त्याच्या हातातली मशीनगन क्षणभर शांत झाली आणि त्याचा फायदा घेत शत्रूनं त्यांच्या दिशेनं एक घातक बॉम्ब फेकला. तो वसंतापासून केवळ सहा यार्डांवर फुटला आणि धूर व धुळीच्या ढगाखाली दोघेही दिसेनासे झाले.

धुराच्या त्या लोटामध्ये वसंतानं आपल्या जिवलग साथीदाराकडे पाहिलं - वर्मी लागलेली गोळी दिनेशची प्राणज्योत कायमची मालवून गेली होती. वसंत कोलमडला, तो हा क्षण! सैन्यात असला, तरी मृत्यूला त्यानं प्रथम इतक्या जवळून पाहिलं, इतक्या निकट अनुभवलं, तोच हा क्षण!

निमिषार्धासाठी आकाशात विद्युल्लता चमकावी आणि सारं क्षेत्र उजळून निघावं, तसं एका क्षणभरातच कित्येक विचार येऊन गेले, कित्येक प्रतिमा चमकून गेल्या. त्याला स्मरलं - दिनेश नुकताच एका लहानग्या बाळाचा पिता बनला होता. पुढल्या महिन्यात मोठी रजा टाकून गावी जायचं स्वप्न पाहत होता. तिकडे कितीतरी नेत्र डोळ्यांचे काजवे करून त्याची वाट पाहत होते - त्याच्या चिमुकलीचे पिटुकले नेत्र, त्याच्या प्राणप्रियेचे वाटेवर अंथरलेले नेत्र, त्याच्या वृद्ध आईवडिलांचे प्रतिक्षेत दमून गेलेले नेत्र!

आणि त्या नेत्रांना आता दिसणार होतं ते केवळ त्यांच्या लाडक्याचं तिरंग्यात लपेटलेलं कलेवर.

क्षणार्धात वसंताच्या मस्तकात तिडीक उठली. माणसाचं रक्त पिणाऱ्या, जिवलगांची ताटातूट करवून आणणाऱ्या या निरर्थक, निर्बुद्ध लढाया करायच्याच कशाला? आपल्या माघारी आपल्या चैतूचं, आपल्या आईचं काय होईल? उद्या आपला देह चंदनी पेटीतून त्यांच्यासमोर गेला, तर त्या दोघी हा धक्का कसा पचवू शकतील?

त्यापेक्षा...

त्यापेक्षा या धुराचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन पळून जावं का? घरी मोलमजुरी करू, कारकुनी करू - पण रोज सायंकाळी आपल्याला आपल्या परिवाराचे चेहरे पाहायला मिळतील आणि त्यांना आपला चेहरा बघता येईल. यापेक्षा आणखी सुख ते काय?

जावं?

जावं?

धूर खाली बसू लागला होता, आणि त्यासोबत त्याच्या मनात उठलेला धुरळाही थंडावू लागला. त्याला दिसले फोटोतून त्याच्यावर नजर ठेवून असणारे करड्या शिस्तीचे त्याचे बाबा. ते काय म्हणतील? पळपुटा... भ्याड... कुलकलंक?

त्याला दिसली त्याची आई. तिला काय वाटेल? रणांगणातून पळ काढणारा नामर्द जन्माला घालून कूस धन्य होईल का तिची? ‘आईच्या पदराआड लपायचं तुझं आता वय राहिलं नाही,’ असे खडे बोल सुनावेल का ती?

आणि त्याला दिसली त्याची चैत्रपालवी.

ज्या शूर जवानावर तिनं आपली जवानी कुर्बान केली होती, तिला शोधत बसेल का ती आपल्या पराभूत नजरेत? ज्याच्या हातात तिनं मोठ्या विश्वासानं स्वतःचा हात दिला होता, त्याच्या पळपुट्या पायांचीही साथ देईल का ती? घरी पोचल्यावर अभिमानी नजरेच्या पंचारत्या ओवाळणारी चैतूची मान असल्या भेकड नवऱ्यामुळं कायमचीच खाली जाईल, त्याचं काय?

एव्हाना धुरळा पूर्णपणे खाली बसला होता आणि सारं काही त्याच्या नजरेसमोर स्वच्छ दिसू लागलं होतं... मग पुढं काय घडलं, ते त्यालाही नीटसं आठवत नव्हतं. त्याला आठवलं ते एवढंच - धुमश्चक्री थांबलेली आहे; स्फोटकांच्या दारूची काळसर करडी भुकटी, धूळ आणि रक्त यांनी माखलेला वसंत उभा आहे; त्याचे कमांडिंग ऑफिसर फोनवर राधक्काशी बोलताहेत; वसंत अजूनही मनानं बधीर आहे; त्याला फक्त एवढंच ऐकू येतंय, "मौसी, तुझा पोरगा अभिमन्यू आहे. एकटा शत्रूच्या गोटात वाघासारखा शिरला अन् खात्मा केला त्यांचा. भारतमातेचं नाव राखलं त्यानं... आणि मेजर राणेसाहेबांचंही!"

आज हे धूसरसं आठवत त्याची नजरही धूसर झाली... त्याच्या डोळ्यांत अश्रू जमू लागले होते.

चैतूनं त्याचे अश्रू ओघळण्याआधी त्याच्या डोळ्यांतूनच चुंबून घेतले, तेव्हा त्याला पुन्हा तेच जाणवलं, ज्याचा त्या दिवशी त्याला साक्षात्कार झाला होता - राधक्काची ममता आणि चैतूचं प्रेम हे त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं, त्याची कमजोरी नव्हे. त्या दोघी त्याची शक्ती होत्या, त्याचा दुबळेपणा नव्हे. प्रेम क्षीण बनवत नाही; ते बळ देतं!

हे पुन्हा आठवून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित उमललं.

ते पाहून चैतू हसून म्हणाली, "वसंत फुलला, बाई, माझा वसंत खुलला..."

सावली

बाहेर आभाळ भरून आलं होतं. संध्याकाळी सहा वाजता सुद्धा गुडूप अंधार झाला होता. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल असं वातावरण...कॉफीचा मग घेऊन ती गॅलरीत आली. मनात असंख्य विचारांचं काहूर दाटलेलं...या अशा वातावरणात जरा जास्तच भावूक होते ती! छोट्या छोट्या गोष्टी पण मग तिला अर्थपूर्ण आणि महत्वाच्या वाटायला लागतात. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि तिचं मन भूतकाळात हरवलं...आठवणीत रमलं...

काही सुखद तर काही दुखःद पण जगायला बळ देणाऱ्या आठवणी! आठवणींची सफर करत असताना तिचं मन आयुष्याच्या काही अविस्मरणीय वळणांवर येऊन थबकलं. मग आयुष्यातल्या त्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या निरनिराळ्या व्यक्तींचा ती विचार करू लागली...काही खूप जवळची, आपली वाटणारी तर काही जवळची असूनही वेळप्रसंगी परकी वाटणारी...! या अशा स्वार्थी लोकांसोबत चे काही प्रसंग तिला आठवले आणि तिला तिचीच दया आली... तिला वाटलं, इतका जीव लावतो आपण काही माणसांना आणि त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येतं मनात. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो पण त्रास काही संपत नाही. असं का वागवंसं‍ वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी, हे काही केल्या उमगत नाही..! या अशा असंख्य प्रश्नांच्या गर्दीत तिचं डोकं अगदी जड झालं.

" अगं जान्हवी!"
"काय रे शार्दुल?" अचानक भानावर येऊन ती म्हणाली.
"कुठे तंद्री लागलेली एवढी? कसला विचार इतका?"
"काही विशेष नाही रे!"
"विशेष नाही म्हणतेस म्हणजे काहीतरी आहेच! सांगा पटकन.."
"काही स्वार्थी आणि मतलबी माणसांबद्दल विचार करत होते."
"अचानक? कोणी काही म्हणालंय का?"
"नाही रे! तुला नाही वाटत का असं की आयुष्यात काही टप्प्यांवर ही माणसं नसती भेटली तर कदाचित आज आपण एका वेगळ्या वळणावर असतो."
"आणि ते वळण जास्त सुखी असणार होतं का?"
"हां म्हणजे! त्या त्या वेळी ते जास्त चांगलं असलं असतं!"
"आणि प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थीपणे साथ निभावणारी माणसं...त्यांचं काय? त्यांचा नाही विचार करायचा?
"...." जान्हवी निरुत्तर झाली. हा असा विचार तिने केलाच नव्हता.
शार्दुल पुढे बोलू लागला, "जान्हवी, काही माणसं इतकी हक्काची बनून जातात की ती दुखावली जातील ही शंकाच कधी मनाला शिवत नाही. छोट्या रोपट्यांना रोज पाणी द्यायची गरज असते पण डेरेदार वृक्षांना आपण रोज पाणी घालत नाही. त्यांची मूळच एवढी खोलवर रुजलेली असतात की आपण स्वतःहून पाणी द्यायची गरज संपते. ती स्वतःहूनच पाण्याच्या दिशेने वाढतात. तसंच काहीसं असतं या नात्यांचं !"
"बापरे, किती काव्यात्मक बोलतोस रे तू! वाटत नाही हां की इंग्लीश मीडियमचा आहेस!"
"नाही ऐकायचं का तुला? जातो मी. बस एकटीच विचार करत" शार्दुल हसून म्हणाला.
"नाही रे, बोल ना तू! छान वाटतंय ऐकायला "
"मी म्हणत होतो, नात्यांचा कटू अनुभव येऊ लागला की पावलं आपोआप या डेरेदार वृक्षांकडे वळतात. त्यांच्या सावलीत नुसतं बसलं तरी शांत वाटत. त्या मौनात पण एक सुख असतं. अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही..किंबहुना कोणी घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नये, हो ना?"
"बरोबर आहे रे शार्दुल, ही अशी माणसं सगळं सहज सोप्पं करून ठेवतात... एखाद्या मैफिलीच्या सुरवातीला तानपुरा आधीच जुळलेला असावा इतकं सहज..!"
"वाह! तुम्हालाही छान जमतंय की लेखिका बाई" शार्दुल थट्टा करत म्हणाला.
"जमायलाच हवं! तुझी बायको आहे ना मी!"
"बरं चला, बरीच कामं वाट बघतायत..कोड डिप्लॉय करायचाय आजच्या आज!" असं म्हणून शार्दुल घाईघाईत आत गेला पण जान्हवी मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली...

खरंतर, नवे बंध जोडायच्या नादात ती मात्र या जवळच्या धाग्यांना गृहीत धरत गेली. जे शाश्वत आहे त्याची किंमत उरत नाही असं नाही पण त्यांची सवय होऊन जाते असं काहीसं झालं होतं तिचं ! शार्दुल बरोबर बोलत होता. त्याच्या या नेहमी सकरात्मक बोलण्यावरच तर ती भाळली होती! आजही तो तिला एक वेगळं चैतन्य देऊन गेला...आता बाहेरचं वातावरण तिला अजूनच सुंदर दिसू लागलं!

तिने पुन्हा एक कॉफीचा घोट घेतला आणि काही क्षण डोळे घट्ट मिटून घेतले... यावेळी मात्र तिच्या डोळ्यासमोर आली काही हक्काची माणसं जी कायम तिच्या सोबत होती सावलीसारखी! तिचं मन तिला सांगू लागलं, "कधीकधी खूप गृहीत धरतो आपण या हक्काच्या माणसांना. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात पण तरी कधीच साथ सोडत नाहीत... आपला श्वास बनून राहतात." ती पटकन तिची डायरी घेऊन आली आणि सुबक अक्षरात लिहू लागली,

"मनात अनेक विचारांची गर्दी वाढायला लागली की हक्काच्या माणसांकडे आपण सगळं भडाभडा बोलून मोकळे होतो, कारण ही माणसं आपल्याला जज करत नाहीत. कधीकधी वाटतं ही अशी माणसं आयुष्यात नसती तर गुदमरून गेलो असतो आपण आपल्याच विचारांच्या डोहात ! कोणाच्या प्रेमात पडल्यावर ज्यांच्याकडे आधी कबुली दिली जाते अशी ही माणसं... इंटरव्ह्यूमधून बाहेर आल्यावर पहिला फोन ज्यांना केला जातो ती ही माणसं... आजारी असल्यावर ज्यांचा आवाज ऐकावासा वाटतो ती ही माणसं... काहीही लिहिलं तरी त्यांनी आधी वाचावं असं वाटतं ती ही माणसं.. किंवा नुसतं कुठेतरी जाऊन शांत बसावंसं वाटलं तरी सोबत यायला तयार असणारी ही माणसं...

या अशा सवयीच्या लोकांना आज मनापासून थँक यू म्हणायचंय. तुम्ही नसतात तर कदाचित नात्यांवरचा विश्वास उडाला असता. तुम्ही नसतात तर प्रेमात पडण्याची भावना एवढी स्पेशल नसती. तुम्ही नसतात तर पावसात भिजणं फक्त एक कटकट असती. तुम्ही नसतात तर आयुष्याचं चित्र तर रंगीत असलं असतं पण ते रंगीत चित्र बघण्यासाठी हवी असणारी सोबत, ते चित्र निरखणारे सुंदर डोळे मात्र नसते ! मग त्या अशा रंगीत चित्राचा तरी काय उपयोग?

खरंच, तुमच्यामुळे आयुष्यातल्या खूप तडजोडी सुसह्य झाल्यायत... रंगीबेरंगी काचा प्रत्येक जण वेचतो आयुष्यात, पण त्यांना जोडून त्यांचे सुंदर पॅटर्न्स बनवणारा कॅलिडोस्कोप खूप कमी जणांकडे असतो. माझ्यासाठी तो कॅलिडोस्कोप बनलात तुम्ही ! तुमच्याबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं ते कधी समजत नाही. कारण हे अपरिमित आहे... ज्याला स्पष्ट सुरवात नाही आणि शेवट तर नाहीच नाही..!"

पावसाच्या आवाजाने ती भानावर आली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. या सगळ्यात तिचे डोळे मात्र कधी वाहू लागले तिलाच कळलं नाही, पण तिच्या ओठांवर मात्र हसू होतं... समाधानाचं !

देव : तो की ती ?

आयुष्याच्या प्रवासात काही परोपकारांची, सत्कृत्यांची पेरणी करत जा. परतीच्या वाटेवर त्यांची झाडं तुम्हाला सावली आणि फळं देतील”

वाक्य थेट कुठल्यातरी बाबाजींच्या सत्संगातून उचललेलं वाटतंय ना? किंवा शाळेत रोज फळ्यावर बदलणाऱ्या सुविचारासारखं? रोज नवा सुविचार लिहिणं मोठं जिकिरीचं वाटायचं बुवा तेव्हा. शिक्षाच वाटायची. कारण मुळात मी फारसा परोपकारी वगैरे नाही. पण तरीही ते करायचो कारण खडूंच्या खोक्यावर डोळा असायचा. शिवाय वर्गात थोडं चमकायला मिळायचं तो एक बोनसच. बाकी सुविचाराचा अर्थ समजून घेऊन तो आचरणात आणणं वगैरे जरा अतीच वाटायचं तेव्हा. व्यक्तिमत्वविकास वगैरे जडजंबाल शब्द त्या वयात कळावेत अशी अपेक्षा करणं म्हणजे सोमवारी सक्काळी ८.४५ च्या बोरीवली चर्चगेट फास्ट मध्ये विंडोसीट मिळण्याच्या अपेक्षेइतकंच मूर्खपणाचं. उपमा थोडी कायच्या काय वाटतेय ना? पण कुठल्याही महाभागाने अशा दिवशी, अशा वेळी, अशा ट्रेनमध्ये अशी सीट मिळवली आणि ते निव्वळ त्याच्या उदात्त व्यक्तिमत्वामुळे शक्य झालंय असा दावा केला, तर त्याला पोकळ बांबूचे चार फटके यथायोग्य जागी देईन मी. आता सांगतो ही उपमा मला का सुचली ते .

असाच एक सोमवार, अशीच वेळ , आणि अशीच एक ट्रेन होती ती. त्यात आमच्या या जन्मातल्या पुण्याईची बोंब, आणि मागल्या जन्मीच्या पुण्याईचा पत्ता नाही असा मामला. तेव्हा अशा गाडीत बसायला जागा सोडाच, पण गाडीला निव्वळ हात लावायला तरी मिळेल की नाही इथपासून तयारी होती. पण एक भारीपैकी अनुभव पदरात पडला बघा.

त्या वेळच्या बोरीवलीच्या प्लाटफॉर्मचं थोडं वर्णन इथे अप्रस्तुत ठरणार नाही. खरं तर याची देही याची डोळा अनुभवण्याचा प्रकार आहे तो. ट्रेन येताना दिसते तेव्हा सगळं पब्लिक “रेडी स्टेडी स्टार्ट” च्या पवित्र्यात उभं राहतं. दीर्घ श्वास घेतले जातात, अस्तन्या मागे सारल्या जातात आणि डोळ्यात खून उतरतो लोकांच्या. येणाऱ्या ट्रेनला काही अक्कल असती तर ती हा प्रकार बघून परत फिरली असती, आणि पुन्हा आलीच नसती. पण ती बिचारी तिच्या वेळेवर येते, आणि “हर हर महादेव” म्हणावं की “वदनी कवल घेता” म्हणावं अशा दुविधेत असलेली जनता तिच्यावर तुटून पडते. नंतरच्या पाचेक मिनिटात तिथे जे रणकंदन चालतं ते पाहून भले भले पैलवान फेटा आणि लंगोट विकून गांधीवादी व्हावेत. उतरणारे बिचारे प्लाटफॉर्मवर फेकले जातात, आणि तोल सांभाळत स्वतःचे खिसे, मोबाईल वगैरे चाचपत , केस आणि कपडे ठीकठाक करत पुढल्या साहसाला निघतात. काही कालच गावाकडून आलेले नवखे उतरूच शकत नाहीत कारण चढणारे त्यांना उलट मागे रेटतात. आत आलेले नशीबवान लोक क्षणार्धात ‘प्रस्थापित’ होतात आणि चढू पाहणाऱ्या उपऱ्याना त्यांचा निर्णय बदलायला लावतात. शिव्याशाप, रणगर्जना इत्यादींनी सभोवताल दुमदुमतो. माहौल फारच गरम झाला तर दोन दोन टक्के टोणपे दिले-घेतले जातात. आणि एकदाची ती ट्रेन ओल्या नारळाच्या करंजीसारखी टम्म होते.

तर या सगळ्या पार्श्वभूमीवर, माझ्या मते खरे पुण्यात्मे तेच , ज्यांना ट्रेनने प्रवास करायची वेळच येत नाही. नोकरदार वर्ग या सगळ्याला सरावलेला असतो कारण त्याला बिचाऱ्याला दुसरा पर्यायच नसतो. मी मागल्या जन्मी चित्रगुप्ताचे खिसे नक्कीच गरम केलेले असणार, कारण या जन्मी माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने मला ट्रेनने प्रवास करण्याची वेळ रोजच्या रोज येत नाही. गर्दीच्या वेळा टाळून मी माझं वेळापत्रक ठरवू शकतो. पण असं आहे, की सिंह स्वतःच्या गुहेत कितीही टग्या असला तरी त्यालाही शिकारीसाठी कधी ना कधी बाहेर पडावं लागतंच, आणि इतर पोटासाठी झगडावं लागतंच. तद्वत , मलाही त्या दिवशी आयकर भवनला एक काम होतं आणि मुलाखतीची वेळ पाळणं भाग होतं. आदल्या रात्री जरा तापाची कणकण असूनही जाणं टाळता येण्यासारखं नव्हतं.

कसाबसा फलाटावर पोचलो. बघतो तर अशी तोबा गर्दी की जणू पुढल्या तासाभरात जगबुडी येणार होती आणि येणारी ट्रेन आम्हाला कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी नेणार होती. पण ट्रेन येताना दिसली आणि मी पेनल्टी किक थोपवणाऱ्या गोलकीपरचा पवित्रा घेतला. दीर्घ श्वास, पाय भक्कम रोवलेले, आणि शरीरातला स्नायू अन स्नायू स्प्रिंगसारखा ताणलेला, कुठल्याही क्षणी ट्रेनवर झडप घालायला तय्यार ! प्रॉब्लेम एकच होता. या नेत्रदीपक अवस्थेत मी एकटाच नव्हतो. माझ्या आजूबाजूला, आणि पुढेमागे शेकडो असेच लोक उभे होते. ट्रेन स्टेशनात शिरली....जवळ आली....आणखी जवळ...आलीच !

आणि नेमक्या याच क्षणी माझ्यातल्या रणछोडदासाला जाग आली. पुढे होऊ घातलेली धुमश्चक्री लक्षात आली आणि मी ती ट्रेन सोडायचा निर्णय घेतला. पण फार उशीर झाला होता. ऑफस्टंप बाहेरच्या चेंडूला सोडताना जसा उशीर होतो तसाच. माझ्या सहप्रवाशांनी माझा निर्णय एकमताने फेटाळून लावला आणि काय होतंय हे कळायच्या आतच काही सेकंद डोळ्यापुढे काळोख झाला आणि काजवेही चमकले. डोळे उघडले तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो. बाहेरून आत येण्याच्या प्रक्रियेला जो काही कालावधी लागला असेल त्यात मी एखाद्या कणकेच्या गोळ्यासारखा मळला गेलो, एखाद्या जुन्या शर्टासारखा वाशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये फिरलो, आणि होत्याचा नव्हता होणार इतक्यात वाचलो. खाटेत चिरडल्या जाणाऱ्या ढेकणाने आपले अवतारकार्य संपले वगैरे म्हणू नये असं पुलं म्हणाले होते, म्हणून मीही म्हणणार नाही.

असो. आता आत आलोच आहे तर जाऊ चर्चगेटपर्यंत असा विचार करत मी माझे चुरगळलेले कपडे शक्यतो ठीक केले, श्वास जागेवर आणला, आणि आता हाडं मोजायला घ्यावीत या विचारापर्यंत आलो. इकडे तिकडे नजर फिरवली, खिडकी सोडाच पण एकही चौथी सीटसुद्धा शिल्लक नव्हती. या ट्रेनची विंडोसीट फक्त रात्री ट्रेन यार्डात झोपायला जाते तेव्हाच मिळते म्हणतात. नशिबावर चरफडत, आणि बसलेल्या लोकांकडे असूयेने बघत असतानाच एका चौथ्या सीटवरून एक बाई उठून उभी राहिली, आणि देव नक्कीच स्त्रीलिंगी असणार असा कयास मी बांधला. झटक्यात रिकाम्या सीटवर बसू म्हणून मी लगबगीने पुढे झालो तेवढ्यात कानावर आवाज आला. “क्यू सर ? कैसे हो ? पहचाना मेरे को ?”
आता मला देवाच्या लिंगाविषयी ताबडतोब पुनर्विचार करणं भाग होतं, कारण अस्सल मुंबईकर एका तृतीयपंथी आवाजाला झोपेतसुद्धा ओळखू शकतो.

सीटवर बसता बसता मी अत्यंत कृतज्ञ नजरेने तिच्याकडे बघितलं. मेकपच्या भडक थराखालचा निबर, सुरकुतलेला तो चेहरा मला फक्त सुंदर नव्हे, तर चक्क ओळखीचा वाटला.

“ प्रभा ? कैसी हो ?” मी विचारलं.
“अच्छी हू सर . आप ठीक हो ना ? पानी पियोगे ?”

तिने बहुतेक मला गर्दीत चुरगाळलं जाताना बघितलं होतं, आणि नंतर अर्धमेल्या अवस्थेतल्या मला पाहून तिला माझी दया आली असावी. तिने तिच्या पिशवीतून एक पाण्याची बाटली काढली आणि माझ्यापुढे केली.

“ लीजिये सर ! अभी अभी खरीदी है..अभी सील भी नही खोला है !”

आजूबाजूचे लोक आमच्याकडे कुतूहलमिश्रित विचित्र नजरा टाकत होते. मी तिच्याकडून बाटली घेतली आणि सील खरंच बंद आहे हे पडताळल्याबद्दल मनातल्या मनात स्वतःला चार शिव्याही हासडल्या .
एकदोन घोटातच माझ्या जिवात जीव आला, आणि मी तिचे आभार मानले. तिने फक्त तिचे खांदे उडवले आणि म्हणाली “उसमे क्या सर ? इन्सानही इन्सान के काम आता है , और हम तो दोस्त है !”

असंय ना, की एका हिजड्याचा मित्र असणं हा काही दखलपात्र गुन्हा नसला तरी ती काही चारचौघात मिरवण्यासारखी गोष्टही नाही हे मला माहित होतं, पण वेळेला पाण्याचा घोट देणारा हात हा फक्त मित्राचाच असू शकतो हेही खोडून काढता येत नव्हतं. बाटलीत उरलेल्या पाण्यात मला जीव द्यावासा वाटत होता. इथे एका तळागाळातल्या शोषित, पिडीत, अशिक्षित हिजड्याने अत्यंत सहजपणे, निर्व्याज मनाने एका तथाकथित सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाकडे मदतीचा हात पुढे केला होता, आणि तो माणूस ‘लोक काय म्हणतील’ या तीन शब्दांपलीकडे बघूच शकत नव्हता. आणि प्रभाने मला माझा मित्र समजावं असं मी काहीच केलं नव्हतं ही जाणीव माझा संकोच आणखीनच अधोरेखित करत होती. अगदी खरं सांगायचं तर पाचसहा वर्षांपूर्वीदेखील याच प्रभाने मला मदत केली होती.........

जूनचा रखरखीत महिना होता तो. पावसाळा तोंडावर आला होता, आणि वातावरण सगळ्या आसमंताला भाजून किंवा शिजवून काढायच्या मूडमध्ये होतं. बेक्कार गदमदत होतं. जणू काही वाऱ्याची आई मेली होती आणि सूर्याचा बाप खपला होता. सकाळी मी मुद्दामच छत्री न घेता बाहेर पडलो होतो, तो फक्त पावसाला खिजवण्यासाठी आणि चिडवण्यासाठी. बोरीवलीहून मीरा रोडला जाताना दहिसर चेकनाक्याला रिक्षा बदलावी लागत असे तेव्हाची ही गोष्ट आहे. मी एका रिक्षात बसून चेकनाक्यापर्यंत पोचतो न पोचतो एवढ्यात रिमझिम सुरु झाली, आणि बघता बघता तिने चांगला सूर धरला. पहिल्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुवास मला इतका आवडतो की माती खावीशी वाटते. आज मात्र तो सुवास आलाच नाही कारण कालच नवीन घेतलेले पेटंट लेदरचे शूज आणि बेल्ट आता बरबाद होणार या विचाराने रिमझिम सुरु झाल्याझाल्याच सॉलिड वैतागलो होतो. रिक्षावाल्याला विनंती करून पावसाची झड कमी होईपर्यंत बसू म्हटलं, तर पाउस जास्तच चेकाळला. इथे माझा रिक्षावालासुद्धा सुगीचा मोसम बघून चूळबुळ करू लागला होता. एक रिक्षा सोडून दुसरीत बसेपर्यंत माझ्या शूज आणि बेल्टचा चिखल झाला असता, म्हणून मग कुणी छत्रीवाला दिसतो का ते बघू लागलो. जी पहिली छत्री दिसली तिच्याखाली छत्रीवालाही नव्हता आणि वालीही नव्हती. तो होता एक हिजडा. पण आज माझा वाली तोच, असा विचार करून मी हाताच्या इशाऱ्याने तिला बोलावलं. ओलेत्या अंगाला एकदम जालीम आळोखेपिळोखे देत देत ती जवळ आली. मी विचारलं “क्या मुझे दुसरे रिक्षातक तुम्हारे छातेमें छोडोगी ?”
“छातेमें क्या रखा है राजा , सीधे मेरे दिलमें आजा !” तिने थेट ऑफर दिली. मग हसत म्हणाली “आओ सर ! इतनीसी तो बात है, खुशीसे कर दूंगी ! आखिर इन्सान ही इन्सानके काम आता है !”

अंगाचा स्पर्श टाळत, आणि छत्री माझ्या वाट्याला जास्त कशी येईल या बेताने तिने मला दुसऱ्या रिक्षापर्यंत सोडलं. मी तिचं नाव विचारलं, माझं सांगितलं, आणि एक दहा रुपयांची नोट तिच्या पुढे धरली. नम्रपणे हसत तिने ती नाकारली आणि म्हणाली “एक जंटलमन को मदद करनेका मौका मिला आज ! पैसे लेकर उसका मजा कम नही करूंगी !”
ती तिच्या मार्गाने चालू लागली, माझी रिक्षा माझ्या मार्गाला लागली. तिला मिळालं होतं एक साधं, निर्व्याज समाधान, एका तथाकथित जंटलमनला मदत केल्याचं. तर मला मिळाला होता एक अनपेक्षित, समृद्ध करणारा अनुभव.

त्यानंतर आम्ही बरेचदा भेटलो. त्याच चेकनाक्यावर, जिथे ती तिचा धंदा करायची. धंदा हा शब्द तिचाच. भिक या शब्दावर खूप चिडायची ती. म्हणायची “उसूलवाले है हम ! दुवा बेचते है, रोटी खरीदते है !”
मला जमेल तेवढा बिझिनेस मी तिच्याबरोबर करायचो. आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून, कडकडा बोटं मोडून ती मला दुवा द्यायची, दृष्ट काढायची. . .

पुढे पुढे माझ्या कामाचं स्वरूप बदललं आणि मी घरूनच माझी कामं करू लागलो. प्रभाच्या भेटी कमी होत गेल्या आणि ती हळू हळू विस्मृतीच्या पडद्याआड गेली.

इथे flashback संपतो. मी पुन्हा ट्रेनमध्ये आहे. माझ्या डोक्यावरून हात फिरवून, पाण्याची बाटली मलाच देऊन प्रभा गोरेगावला उतरली, आणि मी इथे बसून आहे, माझ्या चुरगळलेल्या कपड्यांविषयी आणि आयकर भवनातल्या माझ्या कामाविषयी विचार करत.

मी सुरुवातीलाच स्पष्ट सांगितलंय की मी परोपकारी वगैरे नाही. जागरूकपणे सत्कृत्य करणारा तर नाहीच नाही. म्हणूनच असं वाटतंय की प्रभासारखी माणसं मला भेटावीत यामागे काहीतरी पूर्वसंचित असावं. निव्वळ माझं चांगलं नशीब म्हणून प्रभा मला दोनदा भेटली आणि मी या जन्मात न केलेल्या काही सत्कृत्यांची फळं माझ्या पदरात टाकून गेली. देव करो आणि ती जिथे कुठे असेल तिथे सुखात असो आणि तिला कुणाच्याच मदतीची कधीच गरज न पडो. पण ती उद्या मला तशा परिस्थितीत भेटलीच तर तिच्याइतक्याच निर्व्याज मनाने मला तिला मदत करता यावी इतकं मोठेपण माझ्या अंगी असो.

बरं ! आता देव पुल्लिंगी की स्त्रीलिंगी यावर चर्चा करुया का आपण ?
रेशीम डबा 

४०-४५ वर्षा पुर्वी आईने केलेल्या सुबक भरतकाम 'कट वर्क' चा सेट घर आवरताना ऐका प्लॅस्टीकच्या पिशवीत जपुन ठेवलेला दिसला. खर तर प्लॅस्टीकची पिशवी फेकण्यासाठीच हातात घेतली होती...मनाने ती पिशवी तशीच फेकण्या पेक्षा एकदा बघुन तर घे असा कौल दिला...बर झालं बघीतलं!
नाही तर...केवढा मोठा अनर्थ घडला असता...
... मन हळूच आठवणीत रमायला गेलं.
रात्री घरातली सर्व काम आटोपल्यावर, आम्हा भावंडाना झोपवुन, आई तीचा रेशीम डब्बा काढायची व शांत पणे आपले भरत काम करायची...खरंतर ती इतकी दमलेली असायची दिवस भर घरातली काम करुन, कि तीने झोपायलायच पाहीजे होते...कदाचित बाबा दौर्यावरून रात्री उशिरा घरी येतील म्हणुन वाट पाहत बसत असेल...
आईने झोपवले तरी पटकन मी झोपणार कशी?...
थोड्यावेळाने डोळे किलकीले करुन कोण काय करतं हे बघत बसायची...
तर आई शांत पणे आपले भरतकाम करत असायची... तेंव्हाचा तीचा शांत, प्रसन्न चेहरा अजुनही मला आठवतो...
आणि मी झोपायचे सोडून आपणही तीच्या सारखं सुई दोरा हातात कधी घेऊ याच स्वप्न बघत कधी झोपी जात असे हेही कळत नसे.
मी बरेच वेळा तीच्या भरतकामात ढवळा ढवळ केलेली आहे माझ्या इवल्या इवल्या हातांनी तीच्या नकळत.
रात्री ती भरतकाम करत असतांना मी झोपले असे भासवुन तीच्या कडे हळूच बघत असे तीच्या लक्षात आले की नाही आपली ढवळा ढवळ??? आणि ती आपल्याला रागवेल याची भितीपण वाटत असे.
...ती आपली सर्व लक्षात येवुन सुद्धा काही झालेच नाही असे दाखुन,मी करून ठेवलेला गुंता हळूच सुईने ती सोडवून नीट करायची व आपले पुढील काम सुरू ठेवत.
आई सांगेल त्या रंगाच्या अँकरच्या रेशीम लडी बाबा आणुन देत असे...
आईने बरेच भरतकाम केले होते व ती फावल्या वेळात कोणी शिकवता म्हटले कि शिकवत पण असे.
तीच भरतकाम बघुन आम्ही कधी शिकलो हे कळले पण नाही...
आता आठवुन वाईट पण वाटत. वाटेल तशी रेशीमांची नासधुस केली होती.
सुईत नीट रेशीम धागा घालता येत नसे, कुठे तरी गाठ पडायची, ती हळुच सोडता येते हे समजायचे नाही त्या छोट्या वयात, मग जोर लावुन धागा तोडायचा... त्यात बरेच वेळा सुई तुटायची, हाताला टोचायची...धागा तोडायला मग दातांचाच वापर केला जात होता... गंमत वाटायची धागा दोन दातांच्या मधे पकड्याचा व दात एकमेकांवर घासायचे तोडायला. धागा तुटल्यावर जग जिंकल्याचा आनंद चेहर्यावर असायचा!!!
काहीच वर्षात आईचा रेशीम डब्बा आम्हा बहिणींकडे आला हे कळलेही नाही...
सुट्टीत काय करायच? हा प्रश्न कधी शाळा, काॅलेज मधे असताना पडलाच नाही, वेगळे कापड व आवडेल ते चित्र त्यावर काढुन वाटेल तशी रंगसंगत करत भरत काम, क्रोशा किंवा काही तरी कलाकुसरीचे काम, पुस्तक वाचन करत बसायचे.
संपले रेशीम धागे, नवीन रंगाचे रेशीम हवे असतील तर बाबा आणून द्याचे नेहमी...त्यामुळे आमचा रेशीम डबा रंगीबेरंगी रेशमांनी भरलेला असायचा...
कोणाच काम अपुर्ण असेल तर मला घाई व्हायची ते पुर्ण करायची...बर्याच वेळा त्यावरून ओरडापण खाल्ला आहे!
काम पुर्ण झालेतरी, सुबक नसायचे!!!
पुर्ण झालेल्या भरतकामाचे कापड आई खुबीने टेबल वैगरेवर टाकायची...
हा रेशीमडब्बा, नुसताच डब्बा नव्हता तर एका पिढी कडून दुसर्या पिढीकडे सुपुर्त केलेल्या संस्कारांचा साक्षिदार होता.
नकळत रेशमाचा गुंता सोडवता सोडवता, जीवनातील भावनीक गुंतागंत कसे शांतपणे सोडवायचे याचे बाळकडुपण ह्याच डब्बात साठवले गेले होते.
नंतर...सुईचा वापर टाका टाकायला व काढून टाकायला करायचाहे ही शिकले. नुसता धागा काही वस्तु बांधायला केलेला...
एका वस्तुचा वापर वेग वैगळ्या पध्दतीने करायचा असतो हे ही गुपित हळूहळु शिकायला मिळाले...
असा हा रेशीम डब्बा, जिव्हाळयाचा डब्बा!!!

खंत वाटते ह्या जिव्हाळ्याच्या रेशिम डब्याला पुढच्या पिढीकडे नाही पोहचवता आला...
बटन तुटली कि सेलो टेप लावली जाते, पिन मारली जाते...
पण सुई दोरा हातात घेतला जात नाही.
कपडा थोडा उसवला तरी फेकुन दिला जातो. प्लास्टीकच्या जमान्यात वापरा व फेका, दुरस्ती करून वापर करायच माहित नाही... माहिती करून घ्यायचा कंटाळा!!!

कथा- मी आणि तो

त्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो? शाळेतल्यासारखा?किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत अल्लडपणे पाहिलेली स्वप्न' आज परत सत्यात रूपांतरित होतील असं वाटतंय. अजूनही मात्र त्याचा भाव खाण्याचा स्वभाव काही बदलला नाही. इतके दिवस ‘भेटूया’ म्हणून मीच त्याच्या मागे लागले होते. शाळेत असताना माझं त्याच्यावर प्रेम होतं... आणि त्याचंही होतंच माझ्यावर. मला जाणवायचं ते, त्याच्या नजरेतून. तेव्हा सगळं बोलायचं राहून गेलं. आता मात्र मी व्यक्त होणार, मी ठरवूनच आले होते.
     हा सगळा विचार मनात चालू असताना माझ्यासमोर एक कार येऊन थांबलेली मला कळलंच नाही.
"हॅलो मीनल ."काच उघडून आतल्या व्यक्तीने मला हाक मारली आणि मी त्या व्यक्तीकडे बघून क्षणभर अचंबितच झाले. ती व्यक्ती म्हणजे 'तोच' होता. चेहरा केवढा बदललाय याचा. डोक्यावरचे केस तिशीतच पांढरे आणि विरळ झालेत. काय हे ?
     "अरे तू?क्षणभर तर मी तुला..."मी.
    "ओळखलच नाही ना. मला माहितीय." तो.
   "कशी ओळखणार? किती बदललायस तू. इतका बारीक झाला आहेस आणि आधीसारखा..."
  "आधीसारखा हॅंडसम नाही राहिलो." त्याला माझ्या मनातलं सगळं कळत होतं . त्याच्या या वाक्यावर मी मंद हसले. त्याची जशी आकृती मी मनात रेखाटली होती,तसा तो अजिबात राहिला नव्हता. त्याच्या फेसबुकवरच्या फोटोतही तो किती स्मार्ट दिसतो. हं ... जुना फोटो असणार. शाळेनंतर इतक्या वर्षांनी मी फेसबुकवरच तर त्याला शोधलं आणि भेटण्याचा अट्टाहास केला . आता त्याला असं पाहून माझा निरस झाला, पण काही क्षणच. नंतर माझ्या मनानं त्याला आता आहे तसा कधी स्वीकारलं, हे माझ्या बुद्धीला कळलंच नाही. यालाच खरं प्रेम म्हणतात का?
"जायचं का कॉफीशॉपमध्ये?" तो.
"आं.. "मी भानावर आले. स्मितहास्य करत "हो"म्हणाले.
" काय रे, या वयात केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर थकल्यासारखे भाव आहेत. हा काय ऑफिसमधल्या कामाच्या तणावाचा परिणाम आहे का?" कॉफीचा घोट घेत मी त्याला विचारले.
"कामाचा स्ट्रेस?आयुष्य इतकच नसतं गं." त्याच्या या बोलण्याबरोबर त्याचा चेहराही गंभीर झाला. प्रेमभंगाची भानगड आहे की काय? मी मनाशीच विचार केला.
"मग हा सगळा कशाचा परिणाम आहे ते तरी सांग." मी.
"जाऊ दे ग...मला सांग,तू कशी आहेस,कसं चाललंय सगळं?' तो.
"मी मस्त आहे रे."औपचारिकपणे मी बोलून गेले. आता मला अजून वेळ घालवायचा नव्हता. मनातलं सगळं त्याच्यासमोर मांडायचं होतं, हो सगळंच. मी मनात सगळी तयारी केली,क्षण दोन क्षण त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, "मला अजूनही तू आवडतोस. शाळेतलं प्रेम तसंच राहून गेलं. चल,आता नव्याने आयुष्य सुरु करू... म्हणजे… प्रत्यक्षात इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय तरी मी डिरेक्टली कसं विचारतेय, असं वाटेल तुला,पण आपल्याला एकमेकांच्या स्वभावाची ओळख आहे..आपण लग्नाचा विचार करूया?"
 माझ्या या अनपेक्षित बोलण्याने तिथल वातावरणच बदललं. दोघेही काही वेळ स्तब्ध झालो.
"डायरेक्ट क्लीन बोल्डच केलंस.. काय गं? तुला कोणी मिळालं नाही वाटतं इतक्या वर्षात,म्हणून आता परत माझी आठवण आली." त्याचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही आधीसारखाच शाबुत होता.
"मिळाले ना पण कुठलंच टिकलं नाही.मधल्या काळात काही वाईट अनुभव आले . " मी.
"म्हणून पुन्हा मीच आठवलो? शेवटचा पर्याय."तो हसला. 
"खरं सांग,तुलाही मी आवडत होते ना शाळेत खूप?" मी.
"आवडत होतीसच. कदाचित अजूनही आवडतेस. पण तसा काही विचार नाही केला. रादर करायचाच नाही." तो.
"का? कुणी मिळालं का? " श्वास रोखून मी विचारले.
"तसं काही नाही, पण आता कसलाच विचार करायला वेळ नाही माझ्याकडं." तो पुन्हा सिरीयस दिसत होता. "मला कोणाचंही नुकसान करायचं नाही. " तो पुढे म्हणाला.
"म्हणजे?.. असं कोड्यात बोलू नको बाबा." मी.
"मी सशक्त माणूस नाही. माझ्या दोन्ही किडन्या जवळपास फेल झाल्या आहेत. आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस असते. शरीराने थकून जातो ग. दोन वर्षं होत आली आता, हाच दिनक्रम चालू आहे, हा त्रास लपवून मला कोणाशी लग्न करायचं नाही. माझ्याबरोबर अजून एकाला या खाईत लोटायचं नाही." तो बोलून गेला आणि माझे कानच बधिर झाले. मी त्याच्याकडे बघत राहिले, माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि चेहऱ्याने थकलेला दिसत असलेला तो,मनाने आनंदी होता. विचारांनी समृद्ध भासत होता. त्याच्या बिघडलेल्या प्रकृतीचं,गळालेल्या आणि पिकलेल्या केसांचं गूढ मला उकललं. त्याला भेटण्यापूर्वी किती किती स्वप्नं रंगवली होती मी,आणि आता भेटल्यानंतरचं त्यांनं सांगितलेलं सत्यच भयाण स्वप्नवत वाटत होतं.
 "कसं झालं हे? आणि हे डायलिसिस कधीपर्यंत?" मी भानावर येऊन विचारलं.        
"किडनी फेल होण्याची तशी बरीच कारणं आहेत. डायबिटिस, हाय बी. पी., अँटिबायोटिक्सचे जादा डोस वगैरे,पण माझं किडनी फेल होण्याचं नेमकं कारण अजून कळालं नाही. हे डायलिसिस आयुष्यभरासाठी आता." तो सहजपणे म्हणाला.
"आयुष्यभरासाठी? मग यावर दुसरा उपाय? " मी.
"किडनी ट्रान्सप्लांटेशन हा डायलिसिस थांबवण्यावरचा उपाय. पण इट हॅज् इट्स ओन कॉम्प्लिकेशन्स अँड इशूज. तरी ट्रासनप्लांटेशनबद्दलचा विचार चालू आहे." तो.
  माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते. नजर त्याच्यावर स्थिरावली होती. मन सुन्न झालं होतं. त्याला हे सर्व जाणवलं.
 "अगं वेडी आहेस का तू? काही काळजी करू नको. होईल सगळं ठीक." तोच मला धीर देत होता.
 "तुझे आईबाबा कसे आहेत?" मी.
"काळजी करतात माझी, पण स्वीकारलंय त्यांनी सगळं." तो.
"तू स्वतःला एकट' समजू नकोस. मी कायम तुझ्यासोबत असेन. " मी.
"तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी ते सगळं सांगितलं, आता शब्दांनी वेगळं सांगायची काय गरज आहे..चल,निघू या आपण आता." तो.
  त्याला भेटायला जाताना मनातल्या मखमली कप्प्यातील प्रस्ताव मांडायचा विचार करणारी मी, त्याच्यासमोर तो विचार मांडूनही नियतीच्या विपरीत खेळाची एक शिकार बनून परतले. आणि तो? आयुष्याशी एकटाच संघर्ष करत होता. तरी त्याची काही तक्रार नव्हती. दुःखही आयुष्याचा एक भाग आहे, असं म्हणायचा. या दुःखाची कसली परिभाषा करावी?
   ***************************************************************
           आम्ही दर पंधरा दिवसांतून एकदा तरी ठरवून भेटायला लागलो. कधी सिनेमाला जायचो,कधी कॉफीसाठी भेटायचो. कधी कधी भेटून फक्त गप्पा मारायचो. त्याचा सामाजिक कार्यातही सहभाग असायचा. एका NGO तर्फे तो गरीब, मागासलेल्या मुलांना शिकवायला जायचा. मला भेटल्यावर त्याबद्दल इतकं भरभरून बोलायचा की मी त्याच्या आजारपणाबद्दल विसरून जायचे. त्याच्या बोलण्याने भारावून जायचे. कधी कधी मात्र तो महिनाभर भेटायचा नाही. अशक्त वाटायचं त्याला. डायलिसिसनंतर खूप थकून जायचा. त्याच्या फोनवरच्या बोलण्यावरून ते जाणवायचं. मग मी त्याच्या घरी कधी कधी जाऊ लागले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांशी माझी ओळख झाली.
   त्याच्या तब्येतीत चढ-उतार होत रहायचे. मी भेटायला गेल्यावर कधी कधी तो उन्मळून पडलेला असायचा, त्यावेळी फारसं बोलायचा नाही.त्याला शारीरिक त्रास कमी होत असला की मात्र खूप गप्पा मारायचा, भरभरून बोलायचा. नोकरीवर सारख्या रजा पडत असल्यामुळे त्याला नोकरीही सोडावी लागली. त्याचे आई-वडीलही त्याच्या आजारपणामुळे त्रस्त असायचे. तो यातून लवकरात लवकर बरा व्हावा, एवढंच स्वप्न त्यांच्या डोळ्यात मला दिसायचं.   
          या सगळ्यात मी स्वतः त्याच्यात गुंतत गेले, अगदी मनाने, माझं मलाच कळलं नाही. नंतर मी मनाशी ठाम विचार केला,काही झालं तरी त्याला आपण एकटं पडू द्यायचं नाही. त्याची सोबत करायची. त्याच्याशी लग्नं करायचं. मी त्याचाशी लग्नं केलं म्हणून माझं नुकसान होईल,हे ठरवणारा तो कोण? मी त्याला पूर्ण बरी करेन.
         एके दिवशी त्याच्या आई-वडिलांच्या संमतीनं त्याचं किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या तब्येतीत सुधारणाही होत होती. ट्रान्सप्लान्टनंतर त्याचं डायलिसिस बंद होणार याची मलाही माहिती होती,म्हणून या निर्णयाने मी खुश झाले. तो आता लवकरच डायलिसिस मधून सुटणार होता. कायमचा.
 **********************************************************************
        तो डायलिसिसमधून कायमचा सुटला... पण ऑपरेशन होण्याधीच. नियतीनं आपला खेळ खेळला होता. त्याच्या घरी जाण्याचं माझं धाडस होत नव्हतं,पण त्याच्या आई-वडिलांचा निराधार चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि मी त्याच्या घरी गेले. त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर मला काहीच दिसत नव्हतं. दुःख,वेदना,त्रास काहीच नाही . म्हणूनच ते चेहरे मला जास्त वेदनादायी वाटत होते. ते भाव दुःखाच्याही पलीकडचे खोलवर होते.
    "असा कसा अचानक निघून गेला?त्याच्या तब्येतीत सुधारणा होत होती. परवाच बोललो आम्ही. आता तर आपण ट्रान्सप्लान्टही करणार हॊतॊ." त्याच्या वडिलांना विचारताना मला अश्रू अनावर झाले होते.
  "परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार?" ते एवढेच बोलले. यातच त्यांच्या कितीतरी भावना एकवटल्या होत्या.
          थोड्या वेळाने शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत मी गेले. सगळं सुनं सुनं वाटत होतं. त्याचा रिकामा पलंग, त्याची औषधं, त्याची पुस्तकं सगळं मी माझ्या आसवांत सामावून घेतलं. जगणाऱ्यानं एक दिवस मरायचंच आहे, हे लक्षात ठेवलं की जगणं सोपं होतं. अचानक मला त्यानं परवा म्हटलेलं हे वाक्य आठवलं. म्हणजे त्याला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती की काय? असावीच, कारण त्याने आपले मरणोत्तर डोळे दान कारण्याबद्दलही सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्याचे डोळेही दान करण्यात आले. बाकी अवयव चांगले असते तर त्याने तेही दान करण्यास सांगितलं असतं. त्याचा जन्मच इतरांसाठी होता. जेवढं जगला, भरभरून जगला. शाळेत प्रत्येक संकटांना हसत हसत सामोरं जायचा तो. आजही तो लढवैय्या ठरला. मृत्यूशी तो लढलाच, पण मृत्य जवळ आल्यावर त्यालाही लढवैय्येपणानं स्वीकारलं. तो म्हणायचा , प्रत्येक क्षण भरभरून जगलं की मृत्यू कधीही ओढवला, तरी त्याची खंत वाटत नाही. त्याच्या प्रेमानं मला शिकवलेलं जगणं मला आठवत होतं. मग आज मी का त्याच्या आठवणीत रडत बसू? त्याला ते आवडणारच नाही, तो स्वतः आनंदी असेल जिथे आहे तिथे. मग मीही त्याची प्रत्येक आठवण मनात साठवत त्याच्या खोलीतून बाहेर पडले. ती प्रत्येक आठवण मला समृद्ध करत होती.